भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत खेळल्या जात असलेल्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण न्यूझीलंड संघ केवळ 62 धावात तंबूत परतला. यामुळे भारताला 263 धावांची आघाडी मिळाली होती.
भारताचा दुसरा डाव
भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांना सलामीला पाठवून केली. पहिल्या डावात पुजारा सलामीला खेळला नव्हता. त्याच्या जागी शुबमन गिलने भारताची सुरुवात केली होती. शुभमन गिलला पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना उजव्या कोपराला जबर मार लागला. तो पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्यामुळेच तो सलमीला फलंदाजीसाठी उतरला नाही. दुसऱ्या डावातही मयंक अग्रवालची बॅट तळपली. मयंकने नाबाद 38 धावा केल्या तर चेतेश्वर पुजारा 29 धावावर नाबाद राहिला. भारताने दुसऱ्या डावाची मजबूत पायाभरणी केली असून नाबाद 69 धावा दुसऱ्या डावात झाल्या आहेत. भारताने आता 332 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताच्या विजयाचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झाला आहे असे मानले जात आहे.
पत्त्याप्रमाणे कोसळला न्यूझीलंडचा पहिला डाव
न्यूझीलंड संघाच्या सलामीच्या फलंदाजीसाठी विल यंग आणि टॉम लेथम उतरले. मात्र फार काळ दोघांनाही मैदानावर टिकून राहाता आले नाही. दोघांनाही मोहम्मद सिराजसमोर शरणागती पत्करली. लेथम 10 आणि यंग 4 धावावर माघारी परतले. त्यानंतर डेरी मिशेल 8 धावा, रॉस टेलर 1 धाव, हेन्री निकोलस 7 धावा, रचिन रविंद्र 4 धावा काढून तंबूत परतले. त्यानंतर टॉम ब्लन्डेल 8 धावावर तर टीम सौदी खाते न उघडता माघरी परतले. केल जेमीसनने अखेरच्या क्षणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु 17 धावावर त्याला अक्सर पटेलने माघारी धाडले. विल सोमर्विलेला आर अश्विनने खातेही उघडू दिले नाही. अशा तऱ्हेने न्यूझीलंड संघाचा डाव केवळ 62 धावावर आटोपला. यामुळे भारताला 263 धावांची आघाडी मिळाली आहे.