मुंबई INDW vs ENGW Test : भारतीय महिला संघ आजपासून इंग्लंडसोबत कसोटी सामना खेळणार आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणारा हा कसोटी सामना अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या निवृत्तीनंतरचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. इंग्लंडच्या महिला संघाचा हा 100 वा कसोटी सामना असेल तो त्यांना संस्मरणीय बनवायचा आहे. तर दुसरीकडं हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडच्या सेलिब्रेशनच्या आशा धुळीस मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. 2005 नंतर इंग्लंडच्या महिला संघाचा भारतात हा पहिलाच कसोटी सामना आहे.
भारतीय कर्णधाराचा इंग्लंडला इशारा : बुधवारी डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, 'हे सर्व मानसिकतेबद्दल आहे. टी 20 नंतर थेट लाल चेंडूचं क्रिकेट खेळणं हा आमच्यासाठी मोठा बदल आहे. परंतु, आम्ही आमच्या फलंदाजीची शैली बदलणार नाही. आमचा नैसर्गिक खेळ खेळू अशी चर्चा झालीय. माझा दृष्टीकोन टी-20 सारखाच असेल. आक्रमक फील्ड प्लेसमेंट, आक्रमण आणि गोलंदाजी करू. परंतु आम्ही परिस्थितीनुसार गोष्टी बदलू, असंही भारतीय कर्णधारान म्हटलंय.
आम्हाला फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, टी-20 सामन्याप्रमाणे प्रत्येक तिसरा-चौथा चेंडू हवेत खेळणं टाळावं लागेल. शेफाली वर्मा आणि माझी खेळण्याची पद्धत वेगळी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही आमच्याकडून समान खेळाची अपेक्षा करू शकत नाही- क्रिकेटपटू स्मृती मानधना
2021 मध्ये खेळला होता मागील कसोटी सामना :भारतीय महिला संघानं यापूर्वी 2021 मध्ये दोन कसोटी सामने खेळले होते. एक सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि एक सामना इंग्लंडविरुद्ध खेळला आहे. भारताचे हे दोन्ही सामने अनिर्णित राहिले. तेव्हा मिताली राज कर्णधार होती. आता हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करत आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघांचा इतिहास काय : कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघाची तुलना केली तर खूप फरक आहे. भारतीय महिला क्रिकेट संघानं आतापर्यंत एकूण 38 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी 5 जिंकले आहेत. तर 6 सामने गमावले आहेत. 27 सामने ड्रॉ झाले आहेत. दुसरीकडे, इंग्लंडनं आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी 20 जिंकले असून 15 सामन्यांत पराभूत झाले आहेत. तर 64 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
- भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष/पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, मेघना सिंग
- इंग्लंड संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : हीदर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमाँट, सोफिया डंकली, नताली सायव्हर ब्रंट, अॅलिस कॅप्सी, डॅनियल व्याट, एमी जोन्स, सोफी एक्लेस्टोन, चार्ली डीन, केट क्रॉस, लॉरेन फिलर/लॉरेन बेल
हेही वाचा :
- अंडर १९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या कोण आहे कर्णधार
- ऊसतोड मजुरांच्या जिल्ह्यातील 'सचिन'ची भारतीय क्रिकेट संघात निवड, युएईमध्ये करणार भारतीय संघाचं प्रतिनिधीत्त्व