बार्बाडोस :भारत आणि वेस्ट इंडीज संघादरम्यान बार्बाडोस मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीज संघाला धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने भारतीय संघासमोर 115 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र 115 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजाला मोठी कसरत करावी लागली. भारतीय संघाने 5 बळी गमावत वेस्ट इंडीजच्या संघावर विजय संपादन केला. तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडीज संघाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. भारतीय संघाकडून खेळताना कुलदीप यादवने 4 तर रविंद्र जडेजाने 3 बळी घेतले.
वेस्ट इंडीजचा संघ ढेपाळला : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय फिरकूपटूंनी वेस्ट इंडीज संघाचे कंबरडे मोडले. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडीजचा संघ 114 धावातच गारद झाला. वेस्ट इंडीज संघाकडून कर्णधार शाय होप यानेच सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. वेस्ट इंडीजकडून काइल मायर्स 2, ब्रँडन किंग 17, एलिक एथनाज 22, शिमरोन हेटमायर 11, रोवमन पॉवेल 4, रोमारियो शेफर्ड 0, यानिक कारिया 3, डोमिनिक ड्रेक्स 3, तर जेडन सील्स आणि गुडाकेश मोटीला भोपळाही फोडता आला नाही.