पल्लेकल्ले (श्रीलंका) :India vs Nepal Asia cup २०२३ : पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर, आशिया चषकात सोमवारी भारताचा सामना नेपाळशी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाकडून दुबळ्या नेपाळवर मोठा विजय अपेक्षित आहे. या विजयानंतर भारताचं सुपर फोरमध्ये स्थान निश्चित होईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल.
पाकिस्तान आधीच सुपर फोरमध्ये पोहचला आहे : पाकिस्ताननं 'अ' गटातून आधीच सुपर फोरमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यांचे दोन सामन्यांत तीन गुण आहेत. पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे भारताला एक गुण मिळाला. जर सोमवारचा सामनाही पावसामुळे वाहून गेला, तर भारत दोन गुणांसह सुपर फोरमध्ये पोहोचेल. मात्र रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांना अशाप्रकारे नक्कीच पुढं जायचं नाही.
पाकिस्तानविरुद्ध भारताचा टॉप ऑर्डर फेल : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी काही सकारात्मक बाबी होत्या. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी सुरुवातील टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरची भंबेरी उडवली. एकवेळ भारताची धावसंख्या चार विकेटच्या मोबदल्यात ६६ अशी होती. मात्र त्यानंतर, वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला इशान किशन आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या २६६ वर नेली.
इशान किशनची चांगली फलंदाजी : वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर किशनने एका बाजूनं उत्तम डाव सांभाळला. किशन पाचव्या क्रमांकावर खेळू शकेल की नाही याबाबत साशंकता होती. मात्र परिस्थितीनुसार बचावात्मक आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून तो मधल्या फळीतही यशस्वी होऊ शकतो हे किशननं दाखवून दिलं. तसेच हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीमुळेही संघ व्यवस्थापन खूश असेल. त्याने प्रथम किशनच्या साथीदाराची भूमिका अतिशय चोख बजावली. नंतर त्यानं आक्रमक फलंदाजी केली.