डब्लिन : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका आजपासून सुरू होतेय. आयर्लंडच्या मालाहाइड क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या जाणार्या सामन्यात जसप्रीत बुमराह प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर आयर्लंड संघाचे नेतृत्व पॉल स्टर्लिंग करणार आहे. जसप्रीत बुमराहसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण तो दुखापतीनंतर तब्बल ११ महिन्यांनी मैदानावर परततोय.
जसप्रीत बुमराहचे पुनरागमन : टी-२० मध्ये प्रथमच कर्णधारपद भूषवणारा जसप्रीत बुमराह ११ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. त्यामुळे या मालिकेत त्याच्या फिटनेससोबतच त्याच्या कर्णधारपदाचीही कसोटी लागेल. बुमाराहने यापूर्वी कसोटी सामन्यात भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. मात्र आताच्या टी-२० मालिकेत तो फिटनेस सिद्ध करण्यासोबतच आपल्या नेतृत्वाची छाप सोडण्याचाही प्रयत्न करेल.
या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा : यावेळी आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार जसप्रीत बुमराह वगळता बहुतांश खेळाडू नवीन आणि तरुण आहेत. हे सर्व खेळाडू आशिया कपपूर्वी होणाऱ्या या मालिकेत चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. संजू सॅमसन, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं लक्ष आशिया कपसाठीच्या संघात स्थान मिळवणे आहे. या खेळाडूंनी आपापल्या स्तरावर चांगली कामगिरी केल्यास त्यांना आशिया कपमध्ये संधी मिळू शकते.