लंडन - जेम्स अँडरसनच्या पाच विकेटच्या जोरावर इंग्लंडने भारताला पहिल्या डावात ३६४ धावांवर रोखले. त्यानंतर इंग्लंडने सावध सुरू केली. चहापानापर्यंत इंग्लंडने बिनबाद २३ धावा केल्या होत्या. तेव्हा चहापानानंतर सिराजने पहिल्याच षटकांत डॉम सिब्ली आणि हसीब हमीद यांना सलग दोन चेंडूवर बाद करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले.
दुसऱ्या दिवशी भारताने सात चेंडूत लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांना गमावले. त्यानंतर रविंद्र जडेजा (१२० चेंडूत ४० धावा ) आणि ऋषभ पंत (५८ चेंडूत ३७ धावा) यांनी सहाव्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी करत भारताला ३५० चा आकडा गाठून दिला. ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव गडगडला. पहिल्या डावात भारताने आपले आठ गडी 97 धावात गमावले.
जेम्स अँडरसनने ६२ धावा देत भारताचे पाच गडी बाद केले. त्याला ओली रॉबिन्सन आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी दोन बळी घेत साथ दिली. तर मोईन अली यानेही एक बळी घेतला. सलामीवीर राहुल याने २५० चेंडूत १२९ धावा केल्या. त्यासोबतच रोहित शर्मा (८३), कोहली (४२), जडेजा आणि पंत यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.