नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने सलामीवीर रोहित शर्माच्या दुखापतीविषयी अपडेट दिले आहे. गांगुली म्हणाला, ''जर रोहित त्याची तंदुरुस्ती सिद्ध करत असेल तर तो ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाऊ शकतो.''
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संपल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होईल. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी संघाचा महत्त्वाचा फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला दौर्याबाहेर जावे लागले.
गांगुली म्हणाला, "जर आपण रोहितबद्दल बोललो तर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी तो तंदुरुस्त असावा अशी आपली सर्वांची इच्छा आहे. जर तो या क्षणी तंदुरुस्त असेल तर निवडकर्त्यांकडून त्याचा नक्कीच फेरविचार केला जाईल याची मला खात्री आहे." किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध डबल सुपर ओव्हर सामना खेळल्यानंतरन रोहित कोणताही सामना खेळलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत, कायरन पोलार्ड मुंबईचा कर्णधार झाला असून त्याच्या नेतृत्त्वात आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा मुंबई हा संघ पहिला संघ ठरला आहे.
इशांत शर्माविषयी गांगुलीचे भाष्य -
या संभाषणात गांगुलीने इशांत शर्माच्या दुखापतीबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, ''जर इशांत शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी फिट झाला तर कसोटी संघात त्याची महत्त्वाची भूमिका असू शकेल.'' भारतीय संघ १२ नोव्हेंबरला सिडनीला पोहोचेल. तेथे ते क्वारंटाइन असतील. उभय संघातील कसोटी मालिकेची सुरुवात अॅडलेड ओव्हल येथे १७ डिसेंबरपासून डे-नाईट कसोटी सामन्याने होईल.