ब्रिस्बेन -सिडनीच्या रंगतदार कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून ब्रिस्बेनच्या गाबा येथे निर्णायक कसोटीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ८७ षटकात ५ बाद २७४ धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भरवशाचा फलंदाज मार्नस लाबुशेनने शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. दोन्ही संघातील ही बॉर्डर-गावसकर मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस ही यजमान संघाची सलामी जोडी 'फ्लॉप' ठरली. पहिल्या षटकात भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद केले. वॉर्नर एका धावेवर असताना सिराजने त्याला स्लिपमध्ये असलेल्या रोहित र्शमाकडे झेल देण्यास भाग पाडले. तर, शार्दुल ठाकुरने मार्कस हॅरिसला बाद करत यजमान संघाला दुसरा धक्का दिला. उपाहारापर्यंत २७ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर मात्र, लाबुशेन-स्मिथ जोडीने संघाला सावरले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.
पदार्पण केलेल्या सुंदरने स्मिथला झेलबाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. स्मिथ ३६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेडने ४५ धावा करत लाबुशेनला उत्तम साथ दिली. वेडने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. भारताचा दुसरा पदार्पणवीर टी. नटराजनने वेडला बाद केले. त्यानंतर लांबुशेनने आपले शतक पूर्ण करत संघाला दोनशेपार नेले. लाबुशेनने २०४ चेंडू खेळत ९ चौकारांसह १०८ धावा केल्या. नटराजनने लाबुशेनला पंतकरवी झेलबाद केले. दिवस थांबला तेव्हा कर्णधार टिम पेन ३८ तर कॅमेरून ग्रीन २८ धावांवर खेळत होते.
हेही वाचा - ''बाबरवर एफआयआर दाखल करा'', लाहोर न्यायालयाचा आदेश
नटराजन-सुंदरचे पदार्पण -
या कसोटी सामन्यात भारताकडून टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. सिडनी कसोटीत दुखापत झालेले जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी या सामन्यात खेळत नसल्याने नटराजन आणि सुंदरला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तर, ऑस्ट्रेलियाकडून विल पुकोव्स्की संघाबाहेर असून मार्कस हॅरिसला सामना खेळण्याची संधी मिळाली.