नवी दिल्ली - 'पिंक बॉल' कसोटीमधील आठ विकेट्सच्या पराभवानंतर टीम इंडियाला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. विराट कोहली या कसोटीनंतर मायदेशी परतला. त्यामुळे अंजिक्य रहाणेकडे उर्वरित सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. अनेक संकटानंतरही मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील दुसऱ्या कसोटीत रहाणेच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व मिळवले. या संघाचे क्रिकेटपटू शिखर धवनने कौतुक केले आहे.
हेही वाचा -YEAR ENDER 2020 : क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
या सामन्यात रहाणेचे १२वे शतक आणि रवींद्र जडेजाच्या शानदार अर्धशतकाने भारताला बळ दिले. धवन म्हणाला, "विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही भारताने दुसर्या कसोटी सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. मला खात्री आहे की भारत मालिका जिंकेल. ते चांगले कामगिरी करत आहेत. आपल्या गोलंदाजी व फलंदाजीचा चांगला ठसा उमटला जात आहे.''
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत धवनने चांगली कामगिरी केली. त्याने दोन अर्धशतकांसह २०१ धावा केल्या. अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या 'पिंक बॉल' कसोटीच्या दुसर्या डावात भारताला फक्त ३६ धावा करता आल्या. ही धावसंख्या भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली. भारताच्या या खराब फलंदाजीमुळे ४६ वर्षांपूर्वीचा लाजिरवाणा विक्रमही मोडला गेला.
१९७४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ४२ धावांवर गारद झाला. एकनाथ सोलकर (१८ नाबाद) वगळता एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नव्हती. ४६ वर्षांनंतर भारताने हा लाजिरवाणा विक्रम मोडला.