मेलबर्न -भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलिया संघाने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १९५ धावा करू शकला. या डावात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या स्टीव्ह स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. या भोपळ्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
हेही वाचा -दिल्लीत अवतरले तब्बल ८०० किलोंचे अरुण जेटली!
सामन्याच्या १५ व्या षटकात स्मिथला रविचंद्रन अश्विनने बाद केले. चेतेश्वर पुजाराने स्मिथचा झेल घेतला. स्टिव्ह स्मिथ पहिल्यांदाच भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे. याआधी कधीही तो भारताविरुद्ध शुन्यावर बाद झाला नव्हता. त्यामुळे स्मिथला शुन्यावर बाद करणारा अश्विन पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. कसोटी कारकिर्दीत केवळ पाचव्यांदाच स्मिथ शुन्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे सन २०१६ नंतर पहिल्यांदाच स्मिथ शुन्यावर बाद झाला आहे.