सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंचने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मोठा पराक्रम केला. नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या फिंचने शतक ठोकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या. यासह तो ऑस्ट्रेलियाकडून वेगवान ५००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
सिडनी क्रिकेट मैदानावर (एसीसीजी) भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ही कामगिरी नोंदवली. हा टप्पा गाठण्यासाठी फिंचने १२६ डावांचा सामना केला. त्याच्यापुढे डेव्हिड वॉर्नर असून त्याने ऑस्ट्रेलियाकडून वेगवान ५००० धावा केल्या आहेत. वॉर्नरने ११५ डावांत ही कामगिरी केली.
एकूण क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान पाच हजार धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने १०१ डावांमध्ये हा विक्रम नोंदवला आहे.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर डोंगर -
कर्णधार आरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथच्या वादळी शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५० षटकांत ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला. भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्याला निष्प्रभ करत यजमानांनी पाहुण्यांना अवघड आव्हान दिले. फिंचने ९ चौकार आणि २ षटकारांसह ११४ धावा केल्या. तर, स्मिथने डावाच्या शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहत आक्रमक फलंदाजी केली. शेवटच्या षटकाचे तीन चेंडू बाकी असताना शमीने स्मिथच्या दांड्या गुल केल्या. स्मिथने ६६ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकार लगावत १०५ धावा केल्या.