केपटाऊन (द. आफ्रिका) : आठवा महिला टी-20 विश्वचषक सध्या रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघ आज आयर्लंडशी भिडणार आहे. भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना सेंट जॉर्ज पार्क गेकेबेरा येथे संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे. भारतीय महिला संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. 18 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला 11 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता.
हेड टू हेड :भारतीय महिला संघ जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. तर आयर्लंडचा संघ दहाव्या स्थानावर आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत केवळ एकच सामना खेळला गेला आहे. या सामन्यात भारताने आयर्लंडचा 52 धावांनी पराभव केला होता. 15 नोव्हेंबर 2018 रोजी महिला विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मिताली राजने 56 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. या प्रदर्शनासाठी तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. गेल्या पाच टी-20 सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. आयर्लंडच्या संघाला गेल्या पाच सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकता आला आहे.