वॉर्सेस्टर - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात इतिहास रचला. मितालीने या सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी साकारत भारतीय महिला क्रिकेट संघाला विजय मिळवून दिला. यासह ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज बनली आहे. तसेच मिताली सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे.
मिताली राज सर्वाधिक धावा करणारी फलंदाज
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान मिताली राजने ११ धावा पूर्ण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी ती फलंदाज बनली. इंग्लंडच्या चार्लोट एडवडर्सला मितालीने मागे टाकले आहे. चार्लोट एडवडर्सच्या नावे १० हजार २७३ धावा आहेत. या यादीत न्यूझीलंडची सूजी बेट्स ७ हजार ८४९ धावांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
मिताली राज यशस्वी कर्णधार
मिताली राजच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला आहे. मिताली जगातील सर्वाधिक एकदिवीसय सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे. तिचा हा कर्णधार म्हणून ८४ वा विजय आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला तिने मागे टाकले. क्लार्कच्या नावे ८३ विजयाची नोंद आहे.
मितालीने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत सलग तीन अर्धशतक झळकावले. तिने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७२ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये मिताली राजने ५९ धावा केल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी करुन तिने संघाचा क्लीन स्वीप होण्यापासून वाचवले. मिताली राज या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक अर्धशतके करणारी खेळाडू आहे.
भारताने क्लिन स्विपची नामुष्की टाळली -
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात आली. यातील पहिले दोन्ही सामने इंग्लंड संघाने जिंकले होते. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला आणि क्लिन स्विपची नामुष्की टाळली. उभय संघातील पावसामुळे सामना ४७ षटकांचा खेळवण्यात आला. यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१९ धावा केल्या होत्या. भारताने हे आव्हान तीन चेंडू आणि चार गडी शिल्लक राखत पूर्ण केले. मिताली राजने या सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी केली. याशिवाय स्मृती मंधानाने ४९ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा -Ind W Vs Eng W ३rd ODI : झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम, असा कमाल करणारी जगातील एकमेव गोलंदाज
हेही वाचा -Ind W Vs Eng W ३rd ODI : स्मृती मंधानाने सीमारेषेजवळ घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडिओ