बंगळुरु : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) सुरु आहे. या मालिकेतील आतापर्यंत चार सामने पार पडले आहेत. त्यापैकी प्रत्येकी दोन सामने दोन्ही संघाने जिंकले आहेत. या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी (19 जून) खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाचे दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आज जो संघ सामना जिंकेल, तो संघ मालिका आपल्या नावे करेल.
मालिकेतील पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले होते. त्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकत मालिकेत मुसंडी मारली. त्यामुळे मालिकेतील पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. जर रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली ( Captain Rishabh Pant ) भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर 3-2 च्या फरकाने मालिकाही त्यांच्या नावे होईल. यासह पंत भारतभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा पहिलावहिला कर्णधार बनेल.
कारण यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला मायभूमीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आलेले नाही. आतापर्यंत 2 वेळा दक्षिण आफ्रिका संघाने भारतात टी20 मालिका खेळली आहे. या मालिकांमध्ये एकदा धोनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करत होता, तर दुसऱ्यावेळी विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) भारतीय संघाचा कर्णधार होता. या दोन्हीही मालिका भारतीय संघाला जिंकता आल्या नव्हत्या.