कटक:भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील आज दुसरा सामना ( IND vs SA 2nd T20 ) खेळला गेला. बाराबत्ती स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 4 विकेट्सने विजय ( South Africa won by 4 wickets ) मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिका संघापुढे 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 18.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. त्यामुळे पाहुण्या संघाने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.
149 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाकडून फलंदाज हेनरिक क्लासेनने ( Batsman Henrik Klaassen ) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडून दमदार 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार खेचले. त्याचबरोबर कर्णधार टेम्बा बावुमाने 35 (30) धावांचे योगदान दिले. तसेच मागील सामन्यातील हिरो डेव्हिड मिलरने 20 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने ( Bowler Bhuvneshwar Kumar ) सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याने 13 धावा देताना 4गडी बाद केले. तसेच युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.