दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला गुरुवार पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना ( IND vs SA 1st T20 match गुरुवारी (9 जून) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली येथील अरुन जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार आहे, तत्पुर्वी ऋषभ पंत आणि टेम्बा बावुमा या दोन कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपदाची धुरा टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant ) आहे. त्याचबरोबर उपकर्णधार पदाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पंत गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्याने प्रथमच नेतृत्व करताना आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिले आहे.
यजमानांविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड प्रभावी ठरला आहे. संघाने भारतात चार T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी तीन जिंकले. भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2019 मध्ये खेळला गेला होता. ती तीन सामन्यांची मालिका होती. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. टीम इंडियाने दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना सात विकेटने जिंकला होता.