कोलंबो Ind Vs Pak: आशिया चषक २०२३ मध्ये आज (१० सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला रंगणार आहे. कोलंबोमध्ये दुपारी ३ वाजता हा सामना खेळला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी, विकेटकीपर केएल राहुल आणि इशान किशन यांच्यातील निवडीची कोंडी सोडवणं भारतीय संघ व्यवस्थापनासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
इशानची दावेदारी मजबूत :राहुलच्या संघातील पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनाला अनेक पर्याय मिळाले आहेत. मात्र त्यामुळे वेगळीच डोकेदुखी वाढली आहे. युवा इशान किशननं गेल्या एक महिन्यातील आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलंय. त्यानं चार सामन्यांमध्ये चार अर्धशतकं झळकावत संघातील आपली दावेदारी मजबूत केली आहे. या दरम्यान किशननं डावाची सुरुवात करण्यापासून ते पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
केएल राहुलला दुर्लक्षित करून चालणार नाही : किशन हा डावखुरा फलंदाज आहे. त्याच्यामुळे भारतीय फलंदाजीत वैविध्य येते. त्यामुळे सध्या तरी प्लेइंग ११ मध्ये त्याचा दावा मजबूत आहे. मात्र पाचव्या क्रमांकावर अनुभवी केएल राहुलला दुर्लक्षित करून चालणार नाही. जरी त्यानं मांडीच्या दुखापतीमुळं मार्चपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही, तरी त्यानं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनेक मॅचविनिंग खेळी खेळल्या आहेत.
राहुलची कामगिरी : २०१९ पासून राहुल भारताच्या सर्वात भरवशाच्या फलंदाजांपैकी एक आहे. २०१९ मध्ये त्यानं १३ सामन्यात ४७.६७ च्या सरासरीनं ५७२ धावा केल्या. २०२० मध्ये त्यानं ९ सामन्यात ५५.३८ च्या सरासरीनं ४४३ धावा केल्या. तर २०२१ मध्ये त्यानं तीन सामन्यात ८८.५० च्या सरासरीनं १०८ धावा केल्या. २०२२ मध्ये त्याच्या बॅटमधून १० सामन्यात २७.८९ च्या सरासरीनं २५१ धावा निघाल्या. आणि २०२३ मध्ये त्यानं सहा सामन्यात ५६.५० च्या सरासरीनं २२६ धावा केल्या आहेत.
राहुलच्या पुनरागमनाचे संकेत : या आकडेवारीवर बारकाईनं नजर टाकल्यास संघातील राहुलचं योगदान लक्षात येतं. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलनं १८ सामन्यांत ५३ च्या सरासरीनं ७४२ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचाही समावेश आहे. हे आकडे खूप चांगले आहेत. तसेच राहुल विकेटकिपिंगही करत असल्यानं तो एक प्लस पॉइंट आहे. शुक्रवारी तो यष्टीरक्षणाचा कठोर सराव करताना दिसला. यावरून त्याच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत.