मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आधी हा दौरा या वर्षाच्या अखेरीस खेळवला जाणार होता. आता हा दौरा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर 2022 मध्ये खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केली. कोरोना संकट आणि अति क्रिकेट या दोन कारणांमुळे दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असल्याचे न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे.
आयपीएल 2021 नंतर यूएईमध्येच यजमान भारताकडून टी20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनंतर भारत-न्यूझीलंड यांच्यात भारतामध्ये कसोटी मालिका होणार होती. वर्षाच्या अखेरीस भारताचा संघ न्यूझीलंडमध्ये जाणार होता. पण या लागोपाठच्या स्पर्धांमुळे खेळाडूंना घरच्यांसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारत-न्यूझीलंड क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात बदल करत असल्याचे जाहीर केले आहे.
भारतीय संघाचा टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडचा दौरा निश्चित होता. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंड संघात दोन कसोटी आणि 3 टी-20 सामन्याची मालिका खेळवली जाणार होती. उभय संघातील मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत होणार होती. पण कोरोना आणि अति क्रिकेटमुळे भारतीय संघाचा हा दौरा 2022 मध्ये ढकलण्यात आला.