नवी दिल्ली :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रायपूरमध्ये न्यूझीलंडचा आठ विकेट्स राखून पराभव केला. 109 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्माने 51 धावांची इनिंग खेळली. पण सामना संपल्यानंतर रोहितकडून त्याच्या फॉर्मवर आणि बरेच दिवस शतक न झळकावण्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. यावर रोहितनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, तो ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यावरून तो खूश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, रोहितने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरूमध्ये शेवटचे शतक झळकावले. पण तेव्हापासून आजतागायत त्याची बॅट शांत आहे आणि त्याला एकाही वनडेत शतक झळकावता आलेले नाही.
खेळ बदलण्याचा प्रयत्न :शतक झळकावता न आल्याच्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला, की तो आपला खेळ बदलण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव आणत आहे. विरोधी संघावर दडपण आणणे खूप गरजेचे असते. तो म्हणाला, मला माहित आहे की मोठे स्कोअर आले नाहीत, पण त्याला फारशी चिंता नाही. मी माझ्या फलंदाजीवर समाधानी आहे, माझा दृष्टीकोन चांगला आहे. मी ज्याप्रकारे कामगिरी करत आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता मोठी धावसंख्याही जवळ आली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आशा आहे की, कर्णधार रोहित लवकरच फॉर्ममध्ये येईल. रोहितला एक दिवसीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू मानला जातो. त्याने वनडेमध्ये 10,000 धावाही पूर्ण केल्या आहेत.