डब्लिन : भारत आणि आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी 20 क्रिकेट मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना टीम इंडियानं जिंकलाय. आयर्लंड संघानं भारतासमोर 140 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 'टीम इंडिया'नं फक्त 47 धावा करत हा सामना जिंकला. आता तुम्ही म्हणाल, समोरील संघानं 140 धावांचं आव्हान दिलं तरीही 47 धावा करणारा संघ कसा जिंकणार? पण त्याचं असं झालं की, पहिल्या टी20 सामन्यावेळी पाऊस आला आणि आयर्लंडनं सामना गमावला.
टीम कशी जिंकली : कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना आयर्लंडनं भारतासमोर 140 धावांचं आव्हान उभं केलं. भारतीय संघ धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला. भारतानं दमदार सुरुवात केली. सहा षटकांमध्ये भारताचा एकही गडी बाद झाला नव्हता. या षटकापर्यंत 'टीम इंडिया'ची स्थिती बिनबाद 45 धावा अशी होती. पण 7 व्या षटकात यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्माच्या विकेट गेल्या. त्यादरम्यान पाऊस सुरू झाला. 7व्या षटकातील 5 चेंडू टाकले गेल्यानंतर पंचांनी पावसामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतानं 2 गडी गमावत 47 धावा केल्या होत्या. त्यावेळी 'डकवर्थ लुईस' नियमांनुसार 'टीम इंडिया'ला विजयी घोषित करण्यात आलं.
डकवर्थ लुईस नियम :भारताची फलंदाजी चालू असताना 7 व्या षटकावेळी पाऊस सुरू झाला. पावसामुळे पंचांनी सामना थांबवला. त्यानंतर 'डकवर्थ लुईस' नियम लावण्यात आला. 'टीम इंडिया'नं 7 व्या षटकापर्यंत 2 गडी गमावत 47 धावा केल्या होत्या. जर 7 षटकांमध्ये भारतानं 2 गडी गमावून 46 धावा केलेल्या असत्या तर आयर्लंड विजयी ठरला असता. तर 6.5 षटकाचा खेळ झालेला असताना सामना थांबवला असता, तर भारताच्या 45 धावा राहिल्या असत्या. पण सामना थांबवला तेव्हा भारतानं 2 गडी गमावत 47 धावा केल्या होत्या. दोन धावा जास्त असल्यानं भारताला विजयी घोषित करण्यात आलं.