लंडन - लॉर्डस् कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह, मला बाद करण्याच्या प्रयत्न करत नव्हता तर त्याने माझ्या शरीराला लक्ष्य केलं होतं, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने दिली आहे. दरम्यान, बुमराहने लॉर्डस् कसोटी सामन्यात अँडरसनवर बाउंसरचा मारा केला होता.
टेलेंडर्स पॉडकास्टमध्ये बोलताना जेम्स अँडरसन म्हणाला की, 'मी थोडसं चकित होतो. कारण माझा सहकारी फलंदाज म्हणत होता की, खेळपट्टी स्लो आहे. जेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानात आलो तेव्हा मला जो रुटने सांगितलं की, जसप्रीत बुमराह जास्त वेगाने गोलंदाजी करत नाहीये. यानंतर बुमराहने पहिलाच चेंडू मला वेगाने फेकला. तेव्हा मला करियरमध्ये पहिल्यांदा वाटलं की, गोलंदाज माझी विकेट घेण्याचा प्रयत्न करत नाहीये.'
जसप्रीत बुमराहने त्या षटकात चार नो बॉल फेकले. अँडरसन पुढे म्हणाला, 'तो मला बाद करण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्याने त्या षटकात 10, 11 आणि 12 वा चेंडू फेकला. तो एकापाठोपाठ एक नो बॉल आणि शॉर्ट चेंडूचा मारा करत होता. मला वाटतं की, त्याने दोन चेंडू स्टम्पवर फेकले. ज्यावर मी वाचलो आणि त्यानंतर जो रुट क्रीझवर आला. माझं लक्ष्य होतं की, रुटला स्ट्राइक द्यायची.'