ओवल - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावे अनेक विक्रमाची नोंद आहे. त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात, मैदानात उतरताच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याला मागे टाकत मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. लंडनच्या केनिंग्टन ओवल स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील 166 वा कसोटी सामना खेळत आहे. त्याचा मायदेशातील हा 95वा सामना आहे. अँडरसनच्या आधी सचिन तेंडुलकरने मायदेशात (भारतात) सर्वाधिक 94 कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला होता. या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिग देखील आहे. त्याने ऑस्ट्रेलियात 92 कसोटी सामने खेळली.
इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलेस्टर कुक आणि स्टिव्ह वॉ यांनी आपापल्या देशात समान 89 कसोटी सामने खेळली आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार जॅक कॅलिसने त्याच्या देशात 88 कसोटी सामने खेळली.