लीड्स -इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून चौथ्या दिवशी वापसीची आशा व्यक्त केली जात होती. पण भारतीय संघ दुसऱ्या डावात 278 धावांवर ऑलआउट झाला आणि इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 76 धावांनी जिंकला. इंग्लंडने या विजयासह 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. भारताच्या पराभवानंतर विराट कोहली नाराज झाला आहे.
सामना संपल्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, 'आमचा संघ धावफलकाची स्थिती पाहून दबावात आला. आम्हाला कल्पना होती की, 78 धावांत ऑलआउट झाल्यानंतर 354 धावांच्या मोठ्या आघाडीचा सामना आम्हाला करावयाचा आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतावर दबाव घातला. त्यांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत, आम्हाला अडचणीत आणले.'
आम्ही पहिल्या डावात 78 धावांत ऑलआऊट झालो. खेळपट्टी चांगली होती, पण गोलंदाजांचा दबाव होता. त्यांनी आम्हाला चुका करण्यास भाग पाडले. त्यांनी चांगला मारा केला असल्याची कबुली देखील विराट कोहलीने दिली.
धावा करताना आम्हाला शिस्तबद्ध गोलंदाजीचा सामना करावा लागला. फलंदाजी असताना देखील आम्ही चांगले निर्णय घेऊ शकलो नाही, अशी खंत विराट कोहलीने बोलून दाखवली.
आमच्याकडे मजबूत फलंदाजी नाही, असे तुम्ही म्हणू शकता. पण वरच्या क्रमांकावरिल फलंदाजांना इतक्या धावा कराव्या लागतील की, ज्यामुळे खालच्या फळीतील फलंदाजांवर दबाव वाढू नये. दुसऱ्या डावात फलंदाजीशिवाय कोणती सकारात्मक बाब समोर आली नाही, असे देखील विराट कोहली म्हणाला. दरम्यान, भारतीय संघाचा या वर्षातील हा सर्वात मोठा पराभव आहे.
भारतीय संघाने चौथ्या दिवशी 2 बाद 215 धावांवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली आणि 278 धावांपर्यंत भारतीय संघ ऑलआउट झाला. अवघ्या 63 धावांत भारताने 8 गडी गमावले. यात चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजने आपली विकेट फेकली.
भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 91 धावांची खेळी साकारली. याशिवाय विराट कोहलीने 55 धावांचे योगदान दिले. भारतीय संघ पहिल्या डावात 78 धावांमध्ये ऑलआउट झाला होता. तर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा करत 354 धावांची आघाडी घेतली होती. दरम्यान, उभय संघातील पुढील चौथ्या सामन्याला 2 सप्टेंबरपासून केनिंग्टन ओवलमध्ये सुरूवात होणार आहे.
हेही वाचा -Ind vs Eng : रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चाहता फलंदाजीसाठी मैदानात घुसला, पाहा व्हिडिओ
हेही वाचा -IND vs ENG 3rd test : भारताचा दारूण पराभव, इंग्लंड 1 डाव 76 धावांनी विजयी