नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा संघ सहा वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे सुरू होणार आहे. दोन्ही संघांसाठी ते महत्त्वाचे ठरणार आहे. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे तर भारत ११५ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी मालिकेतील पहिलाच सामना फेब्रुवारी महिन्यात नागपुरात खेळला जाणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनंतर नागपूरकर क्रिकेटप्रेमींना कसोटीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व :ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात एकूण 102 कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे. ऑस्ट्रेलियाने 43, तर भारताने 30 सामने जिंकले आहेत. पण भारतीय संघाने होम ग्राउंडवर चांगली कामगिरी केली आहे. या दोघांमध्ये भारतीय भूमीवर 50 सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारताने 21 जिंकले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने 13 सामने जिंकले आहेत. 15 सामने अनिर्णित राहिले तर एक बरोबरीत राहिला.
खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत :पिच रिपोर्ट टेस्ट क्रिकेट 2008 पासून व्हीसीए स्टेडियमवर खेळले जात आहे. आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या 6 कसोटी सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. येथे खेळलेला एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळू शकते. सकाळी हलके धुके दिसून येईल, उर्वरित दिवस सूर्यप्रकाश राहील.