मुंबई World Cup 2023 IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात ICC विश्वचषकातील 33 वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे, तर श्रीलंकेचं नेतृत्व कुसल मेंडिसकडे असेल. टीम इंडिया या विश्वचषकातील सर्वात मजबूत संघ तर श्रीलंका हा आतापर्यंतचा सर्वात कमकुवत संघ असल्याचं सिद्ध झाले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं या विश्वचषकात 6 सामने खेळले. 6 विजयांसह 12 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर श्रीलंकेचा संघ 6 सामन्यांत 2 विजय आणि 4 पराभवानंतर 4 गुणांसह गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय विश्वचषक 2011 च्या अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून भारतानं याच मैदानावर विश्वविजेतेपद पटकावलं होत.
श्रीलंकेला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक : विश्वचषकातील आपलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं आवश्यक आहे. या सामन्यात श्रीलंकेची भिस्त ही प्रामुख्यानं सदीरा समराविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या तीन फलंदाजांवर राहिल. या तिघांनीही विश्वचषकात आतापर्यंत श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा काढल्या आहेत. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसतंय.
विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न : विश्वचषकात सलग सहा सामने जिंकलेल्या भारताला अद्याप एकही कडवी झुंज मिळालेली नाही. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आघाडीची फळी अपयशी ठरल्याचा अपवाद वगळता भारताच्या फलंदाजांनी प्रत्येक संघाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी केलीय. गोलंदाजीमध्येही भारतीय संघ वरचढ ठरलाय. लंकेविरुद्ध भारतीय संघ संभाव्य विजेता असला तरी श्रीलंकेला गृहीत धरण्याची चूक भारतीय करणार नाही. तसंच हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल.
हेड टू हेड रेकॉर्ड काय : भारत आणि श्रीलंका संघामध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 167 एकदिवसीय सामने झाले आहेत. यात भारतीय संघानं वर्चस्व गाजवलंय. भारतानं तब्बल 98 एकदिवसीय सामन्यांत श्रीलंकेचा पराभव केलाय. तर 57 सामन्यात श्रीलंकेनं विजय मिळवता आलाय. एक सामना बरोबरीत सुटला होता. या दोन्ही संघांमध्ये जानेवारी 1979 मध्ये पहिला एकदिवसीय सामना झाला होता. तर विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका नऊ वेळा आमनेसामने आलेत. यात दोन्ही संघानं प्रत्येकी चार-चार सामन्यांत विजय मिळवलाय. तर एक सामना रद्द झाला होता. भारतानं 2011 आणि 2019 मध्ये श्रीलंकेचा पराभव केलाय. तर 2007 मध्ये श्रीलंकेनं विजय मिळवला होता. 1979 च्या विश्वचषकात पहिल्यांदा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, त्यात श्रीलंकेनं बाजी मारली होती. तर त्यानंतर 1992 मध्ये सामना रद्द झाला होता. 1996 च्या विश्वचषकात भारत आणि श्रीलंका दोनवेळा आमनेसामने आले होते. यामध्ये श्रीलंकेनं विजय मिळवला होता. 1999 च्या विश्वचषकात भारतानं पहिल्यांदा श्रीलंकेचा पराभव केला होता.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
- श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार/ यष्टिरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा आणि दुष्मंता चमीरा
हेही वाचा :
- World Cup 2023 IND vs SL : वानखेडेवर भारत-श्रीलंका सामना बघायला जाताय, पोलिसांनी दिलेल्या 'या' सूचनांच करावं लागणार पालन
- Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं वानखेडेवर अनावरण
- BCCI on Environmental Concerns : बीसीसीआयचा मोठा निर्णय, वायूप्रदूषणामुळं विश्वचषक सामन्यांत 'या' शहरात होणार नाही आतिशबाजी