कोलकाता Virat Kohli Equals Sachin Record :विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील 49 वं शतक झळकावत 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केलीय. मात्र सामना संपल्यानंतर सचिन तेंडुलकरसोबत बरोबरी करू शकत नसल्याचं विराटनं प्रांजळपणे सांगितलं. विराटच्या या प्रतिक्रियेचं सध्या कौतुक होतंय. कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 49 व्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं पाच विकेट्सवर 326 धावा उभारल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.1 षटकांत अवघ्या 83 धावांवर गुंडाळत भारतानं मोठा विजय नोंदवला. यासह विश्वचषकात आपला विजयरथ कायम ठेवलाय.
काय म्हटला विराट : विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यावेळी बोलताना विराट म्हणाला की, "माझ्या हिरोच्या विक्रमाची बरोबरी करणं हा खूप मोठा सन्मान आहे. तो एक भावनिक क्षण आहे. मी कुठून आलो, ते दिवस मला माहित आहेत. मला ते दिवस माहित आहेत जेव्हा मी त्यांना टीव्हीवर पाहिलं होतं. त्यांच्याकडून कौतुक मिळणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे," असं सामन्यानंतर विराटनं म्हटलंय.
'मास्टर ब्लास्टर'कडून कोहलीचं कौतूक : कोहलीच्या विक्रमी शतकानंतर सचिन तेंडुलकरनं X (पूर्वीचं ट्वीटर) वर विराटचं 49 व्या शतकाबद्दल अभिनंदन केलंय. सचिननं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "विराटनं शानदार खेळी खेळली. या वर्षाच्या सुरुवातीला मला 49 ते 50 (वर्षांचं) होण्यासाठी 365 दिवस लागले. मला आशा आहे की पुढील काही दिवसांत तू 49 ते 50 (शतकं) गाठशील आणि माझा विक्रम मोडशील. अभिनंदन", अशी पोस्ट सचिननं केलीय.
तेंडुलकरचा संदेश खूप खास : सचिनच्या पोस्टबद्दल कोहलीला विचारलं असता तो म्हणाला, "त्यांचा संदेश माझ्यासाठी खूप खास आहे.' पुढं कोहली म्हणाला की, चाहत्यांनी हा सामना त्याच्यासाठी खूप खास बनवला. हा एक आव्हानात्मक सामना होता. कदाचित, स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात कठीण संघाविरुद्ध खेळताना आम्हाला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली," असंही कोहलीनं सामन्यानंतर म्हटलंय.