मुंबई Virat Kohli :भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं न्यूझीलंड विरुद्ध वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५० वं शतक झळकावलं. आता तो क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्यानं भारतीय संघाचा माजी दिग्गज भारतरत्न सचिन तेंडुलकरचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडला.
विश्वचषकातील तिसरं शतक : एवढेच नाही तर आता कोहली वनडे वर्ल्ड कपच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्यानं सचिनला मागं टाकलं. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतासाठी शतक झळकावणारा कोहली आता सौरव गांगुलीनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीनं २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील हे तिसरं शतक आहे. साखळी सामन्यांमध्ये त्यानं दोन शतकं झळकावली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात त्यानं तिसरं शतक झळकावलं. विराट कोहलीनं १०६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या दरम्यान त्यानं १ षटकार आणि ८ चौकार लगावले. हे शतक झळकावल्यानंतर स्वतः सचिननं विराट कोहलीचं अभिनंदन केलं.
सर्वाधिक एकदिवसीय शतके :
- विराट कोहली (भारत) - ५०
- सचिन तेंडुलकर (भारत) - ४९
- रोहित शर्मा (भारत) - ३१
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - ३०
- सनथ जयसूर्या (श्रीलंका) - २८