अहमदाबाद Ind Vs Aus Final : क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं विक्रमी सहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानं १४० कोटी देशवासीयांचं स्वप्न भंगलं. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू भावूक होऊन पॅव्हेलियनमध्ये परतताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या डोळ्यात अश्रू होते. तर इतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरही निराशा स्पष्ट दिसत होती.
मोदी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पोहचले : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आले होते. सामना संपल्यानंतर त्यांनी विश्वविजेता ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सकडे ट्रॉफी सुपूर्द केली. यानंतर मोदी ड्रेसिंग रुममध्ये भारतीय खेळाडूंना भेटण्यासाठी पोहचले. खेळाडूंची भेट घेऊन मोदींनी त्यांना प्रोत्साहन दिलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि या विश्वचषकात सर्वाधिक २४ विकेट घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानं ड्रेसिंग रुममधला पंतप्रधान मोदींनी मिठी मारल्याचा फोटो शेअर केला. यासह शमीनं हृदयस्पर्शी करणारी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.