नवी दिल्ली ICC New Rule for Bowler : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) क्रिकेटच्या नियमांत वेळोवेळी बदल केले जातात. याततच आयसीसीनं आणखी एका नियमात बदल केलाय. आगामी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये गोलंदाजानं आपलं पुढचं षटक टाकण्यासाठी डावात तिसऱ्यांदा 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावांचा दंड ठोठावला जाईल. यामुळं फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावा अतिरिक्त मिळणार आहेत. हा नियम सुरुवातीला प्रायोदिक तत्त्वावर वापरला जाणार आहे. हा नियम सध्या पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांत लागू होणार असल्याचं आयसीसीनं स्पष्ट केलंय. आयसीसी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नियम : आयसीसीनं एका निवेदनात म्हटलंय की, 'डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत पुरुषांच्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'स्टॉप क्लॉक' चा वापर प्रायोगिक तत्वावर करण्याचं मुख्य कार्यकारी समितीनं मान्य केलंय. या स्टॉप क्लॉकचा वापर दोन षटकांमध्ये जाणाऱ्या वेळेवर लक्ष ठेवण्यासाठी केला जाणार आहे. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, 'पहिले षटक संपल्यानंतर 60 सेकंदांच्या आत दुसऱ्या षटकाची गोलंदाजी सुरू करावी लागणार आहे. एकाच डाव्यात तिसऱ्यांदा हा प्रकार घडला तर पाच धावांचा दंड ठोठावला जाणार आहे.
खेळपट्टीबाबतही नियमात बदल : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या यजमानपदांवर खेळपट्ट्यांवर बंदी घालण्याची पद्धतही आयसीसीनं बदललीय. यासंदर्भात आयसीसीनं सांगितलं की, 'खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग नियमांमधील बदलांनाही मान्यता देण्यात आलीय. ज्यात खेळपट्ट्यांचे मूल्यांकन कोणत्या निकषांवर केलं जाणं सोपं होणार आहे. एखाद्या मैदानाचा आंतरराष्ट्रीय दर्जा हटवण्यासाठी आता पाच वर्षात डिमेरिट अंकांची संख्या पाचवरुन सहा करण्यात आलीय.
फलंदाजीसाठी काय आहे नियम : फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला खेळपट्टीवर येण्यास उशीर झाल्यास फलंदाजांना दंड म्हणून बाद केलं जातं. या नियमाला 'टाइम आऊट' नियम म्हणून ओळखलं जातं. गोलंदाजीबाबतचा हा नवा नियमही असाच आहे. जर गोलंदाजाला तिसर्यांदा षटक टाकण्यासाठी 60 सेकंद किंवा त्याहून अधिक वेळ लागला. त्यामुळं गोलंदाजी करणाऱ्या संघावर 5 धावांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या विश्वचषकात श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यात श्रीलंकेचा अॅंजेलो मॅथ्यूज हा टाइम आऊट होणार क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला होता.
हेही वाचा :
- क्रिकेट विश्वचषकात चाहत्यांनी मोडला रेकॉर्ड, जाणून घ्या किती लोकांनी स्टेडियममध्ये सामना पाहिला
- वर्ल्डकप फायनलमधील भारताच्या पराभवानंतर २० वर्षीय क्रिकेट चाहत्याचा मृत्यू
- आयसीसी चँपियन संघाचा कर्णधार रोहित शर्माच, संघात ६ भारतीय खेळाडूंचा डंका; विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला चक्क डच्चू