नवी दिल्ली Cricket World Cup 2023: यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत 16 सामने खेळले गेले आहेत. यापैकी काही सामन्यांत फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं तर काही ठिकाणी गोलंदाजांनी आपली छाप सोडली. 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 16 सामने झाले आहेत. 17वा सामना आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात रंगणार आहे. या विश्वचषकात आतापर्यंत दोन उलथापालथी झाल्या आहेत. अफगाणिस्ताननं गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केलं, तर नेदरलँडनं आफ्रिकेला हरवून दुसरं अपसेट केलंय. या विश्वचषकात बॅट आणि बॉलमध्ये जबरदस्त स्पर्धा झाली आहे. धावा आणि गुणतालिकेत कोण-कोण अव्वल आहे ते जाणून घ्या.
गुणतालिकेत कोण अव्वल : गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडनं 4 सामन्यांत 4 विजय मिळवल्यानं ते 8 पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांचा रन रेट +1.923 आहे. तर तीनपैकी तीन विजयांसह भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचे 1.821 च्या रन रेटसह 6 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावील आफ्रिकेनं आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर असून त्यांचे 2 विजयांसह 4 गुण आहेत. पाचव्या क्रमांकावर इंग्लंड आहे, त्यांनी आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला असून त्यांचे 2 गुण आहेत. तर पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ सातव्या स्थानावर आहे.
जास्त धावा कोणाच्या : आतापर्यंत झालेल्या 16 सामन्यांत न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे धावांच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्यानं 4 सामन्यात 83 च्या सरासरीनं 249 धावा केल्या आहेत, तर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान त्याच्यापासून 248 धावा करून फक्त एक धाव दूर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे, त्यानं 72 च्या सरासरीनं 229 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतकांचाही समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा असून त्यानं 3 सामन्यात 72.33 च्या सरासरीनं 217 धावा केल्या आहेत. तर न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रनंही 71.66 च्या सरासरीने 215 धावा केल्या आहेत.
गोलंदाजीत कोण अव्वल : सर्वाधिक बळींबद्दल बोलायचं झालं तर, आतापर्यंत न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरनं 4 सामन्यात सर्वाधिक 11 बळी घेतले आहेत. यात त्याचा इकॉनॉमी रेट 4.40 आहे. तसंच दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्री असून त्यानं 9 बळी घेतले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह असून त्यानं 3 सामन्यात 8 फलंदाजांना माघारी पाठवलंय. नेदरलँडचा बास डी लीडे, श्रीलंकेचा दिलशान मधुशंका, पाकिस्तानचा हसन अली, आफ्रिकेचा कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 7 बळी घेतले आहेत.
हेही वाचा :
- World Cup 2023 IND vs BAN : सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया; मात्र सामन्यात येऊ शकतो पावसाचा व्यत्यय?
- PCB Complaint To ICC : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे तक्रार, चाहत्यांसाठी व्हिसा नाकारल्याबद्दल निषेध नोंदवला
- Cricket World Cup 2023 : पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर; आजचा सामना 'करो या मरो'