मुंबई Cricket World Cup 2023 IND vs SL :विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरलाय. भारतानं श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारतानं 8 गडी गमावून 357 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव 19.4 षटकांत 55 धावांत संपुष्टात आणला. या विजयासह हा संघ विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. भारताचे 7 सामन्यांत 14 गुण झाले असून संघ विश्वचषक स्पर्धेत अपराजित संघ बनला आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीनं 5, मोहम्मद सिराजने 3, जसप्रीत बुमराहनं 1 विकेट घेतली. याआधी शुभमन गिलनं 92 चेंडूत 92 धावा केल्या, त्यानंतर विराट कोहलीनं 94 चेंडूत 88 धावा केल्या, श्रेयस अय्यरनं 56 चेंडूत 82 धावा ठोकल्या.
कोहली-गिलची अर्धशतकी भागीदारी :या समन्यात कोहलीनं आपलं 70 वे अर्धशतक पूर्ण केलं, तर गिलनं 11 वं वनडे अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 179 चेंडूत 189 धावांची भागीदारी केली. 30व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिलशान मदुशंकानं गिलला कुसल मेंडिसकडं झेलबाद केल्यानं ही भागीदारी तुटली.
रोहित शर्मा 4 धावांवर बाद :कर्णधार रोहित शर्माची 4 धावांवर विकेट गमावल्यानंतर सलामीवीर शुभमन गिल, विराट कोहलीनं भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवरप्लेमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पहिल्या 10 षटकात भारतीय संघानं एका विकेटवर 60 धावा केल्या.
श्रीलंकेची खराब फलंदाजी :दुसरीकडं श्रीलंकेच्या संघानं खराब फलंदाजी केली. श्रीलंकेची खेळी सुरु झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर निसंका पायचित झाला. त्याला बुमराहनं बाद केलं. त्यानंतर लगेच दोन विकेट सलग गेल्या. निसंका पाठोपाठ करुणरत्ने, समरविक्रमा शून्यावर बाद झाले. दोघांचाही बळी सिराजच्याच चेंडूनं घेतलाय. करुणरत्ने पायचित झाला तर समरविक्रमाचा झेल अय्यरनं घेतला. समरविक्रमानंतर कर्णधार मेंडीस फक्त १ धाव काढून तंबूत परतला. त्याला सिराजनं बाद केलं. त्यानंतर दोन गडी बाद झाले.
दोन्ही संघाचं हेड टू हेड रेकॉर्ड काय :दोन्ही संघांच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 167 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतानं 98 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेनं 57 सामने जिंकले आहेत. दोघांमधील 11 सामने रद्द झाले तर 1 सामना बरोबरीत राहिलाय. हा विश्वचषकाचा सामना असला तरी. अशा स्थितीत भारतीय संघ श्रीलंकेला कमी लेखून चालणार नाही. आजचा सामना जिंकल्यास टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल.
- या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर श्रीलंकेच्या संघानं आपल्या संघात एक बदल केलाय. अष्टपैलू धनंजय डी सिल्वा ऐवजी दुशान हेमंथा याला संघात स्थान देण्यात आलंय.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन काय :
- भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
- श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार/ यष्टिरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा आणि दुष्मंता चमीरा