कोलकाता Cricket World Cup 2023 IND vs SA : भारतीय संघ विश्वचषकातील आठव्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेतील 37 वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. या सामन्यात भारतीय संघची नजर सलग आठव्या विजयावर असेल. या विश्वचषकात भारतीय संघानं एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेनंही दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यांचा एकमेव पराभव नेदरलँडविरुद्ध झालाय. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अत्यंत धोकादायक आहे. सध्या ते दमदार कामगिरी करत आहेत. गेल्या चारही सामन्यांत त्यांनी विजय मिळवलाय. अशा परिस्थितीत बलाढ्य आफ्रिकन संघासमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी असेल. यामुळं हा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.
दोन्ही संघांची सध्याची परिस्थिती काय : भारतीय संघ सात सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात 14 गुण आहेत. त्याचबरोबर सात सामन्यांत सहा विजयांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे 12 गुण आहेत. हे दोन्ही संघ विश्वचषकात उपांत्या फेरीसाठी पात्र झाले आहेत. कोलकात्यातील सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर असेल. भारतानं जिंकल्यास त्यांचे 16 गुण होतील. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवल्यास त्यांचे 14 गुण होतील. त्यांचा नेट रनरेट (+2.290) भारताच्या नेट रनरेटपेक्षा (+2.102) चांगला आहे.