मुंबई Cricket World Cup 2023 ENG vs SA :क्रिकेट विश्वचषकाच्या 20 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा पराभव केलाय. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं 50 षटकात 7 विकेट गमावून 399 धावा केल्या. त्यांनी इंग्लंडला विजयासाठी 400 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 170 धावा करू शकला. या महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी ढासळलेली पहायला मिळाली. या सामन्यात इंग्लंडकडून मार्क वुडनं सर्वाधिक धावा केल्या. मार्क वुड 43 धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडचा विश्वचषक इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे. विश्वचषकात इंग्लंड कधीच इतक्या मोठ्या फरकानं पराभूत झालेला नाही.
इंग्लंडची फलंदाजी ढासळली :दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची फलंदाजी या सामन्यात ढासळली. या सामन्यात गतविजेत्याच्या फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांपुढं शरणागती पत्करली. इंग्लंडला पहिला धक्का जॉनी बेअरस्टोच्या रूपानं बसला. बेअरस्टो 13 धावा करून बाद झाला. जो रूट अवघ्या दोन धावा करून मार्को जॉन्सनचा बळी ठरला. डेव्हिड मलानच्या रूपानं इंग्लंडला तिसरा धक्का बसला. मालन 6 धावा करून मार्को जॉन्सनचा बळी ठरला. बेन स्टोक्सच्या रूपानं इंग्लंडला चौथा धक्का बसला. बेन स्टोक्सला केवळ 5 धावा करता आल्या. इंग्लंडला पाचवा धक्का कर्णधार जोस बटलरच्या रूपानं बसला. बटलरला केवळ 15 धावा करता आल्या. मार्क वुडनं अखेरीस इंग्लंडसाठी काही धावा नक्कीच केल्या, पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
हेनरिक क्लासेनची 109 धावांची खेळी :मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका विरूद्ध इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा रंजक सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघानं 7 गडी गमावून 399 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर 400 धावांचं लक्ष्य होतं. आफ्रिकन संघासाठी हेनरिक क्लासेननं 109 धावांची शतकी खेळी खेळली. त्यानं 61 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. रीझा हेंड्रिक्सनं 85, रॅसी व्हॅन डर डुसेननं 60, एडन मार्करामनं 42, मार्को जॅन्सननं नाबाद 75 धावा केल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज रीस टोपलेनं 3, तर वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन, फिरकी गोलंदाज आदिल रशीदनं 2 बळी घेतले.
दक्षिण आफ्रिका हायलाईट : दक्षिण आफ्रिकेकडून यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक (4), रीझा हेंड्रिक्स यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू केला. रीस टोपलीच्या पहिल्याच चेंडूवर डी कॉकनं चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर तो जोस बटलरकरवी विकेटच्या मागे झेलबाद झाला. यानंतर रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन (60) यांनी 121 धावांची भागीदारी केली, मात्र 60 धावांवर रॅसी जॉनी बेअरस्टोच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. काही वेळानं आदिल रशीदनं 164 धावांच्या स्कोअरवर इंग्लंडला तिसरे यश मिळवून दिलं. 85 धावांच्या स्कोअरवर हेंड्रिक्स क्लीन बोल्ड झाला. त्यानं 75 चेंडूत 9 चौकार 3 षटकार मारले.
बेन स्टोक्सचा विश्वचषकातील पहिला सामना :हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या विश्वचषकात इंग्लंड-दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना गमावला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ अपसेटचे बळी ठरले. इंग्लंडचा अफगाणिस्तानकडून पराभव झाला तर दक्षिण आफ्रिकेलाही नेदरलँडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात बेन स्टोक्सही खेळत आहे. या सामन्यात इंग्लंड संघात तीन बदल करण्यात आले आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झालेल्या इंग्लंड संघात खेळलेल्या तीन खेळाडूंच्या जागी बेन स्टोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सनचं पुनरागमन झालंय. बेन स्टोक्सचा विश्वचषकातील पहिला सामना आहे.