नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : बांग्लादेश क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आघाडीचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन दुखापतीमुळे चालू विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ६ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूजला टाईमआऊट नियमानुसार बाद केल्यामुळे तो वादात सापडला होता. दरम्यान, आता शाकीब या विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर पडला आहे.
शाकिब दुखापतीमुळे बाहेर : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना शाकिबच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रे मध्ये त्याच्या बोटात फ्रॅक्चर आढळून आलं. शाकिबच्या दुखापतीबाबत माहिती देताना संघाचे फिजिओ बायजेदुल इस्लाम खान म्हणाले की, 'फलंदाजी करताना डाव्या हाताच्या बोटाला चेंडू लागल्यानं शाकिबला दुखापत झाली होती. यानंतर त्यानं टेप लावून आणि पेनकिलर घेऊन फलंदाजी केली. तपासानंतर बांग्लादेश टीम मॅनेजमेंटनं तो विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर पडल्याची पुष्टी केली आहे.
उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर : विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशचा एकच सामना शिल्लक आहे. ११ नोव्हेंबरला पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर त्यांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होईल. बांग्लादेशचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला असल्यानं हा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता असेल.
शाकीब कर्णधार म्हणून अपयशी : २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेश संघाची कामगिरी अत्यंत साधारण राहिली आहे. तर शाकीब अल हसन कर्णधार म्हणूनही पूर्णपणे अपयशी ठरला. बांग्लादेशला खेळलेल्या ८ सामन्यांपैकी केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. तर ६ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. ते गुणतालिकेत ४ गुणांसह ७ व्या स्थानी आहेत.
हे ही वाचा :
- Cricket World Cup 2023 : टीम इंडियाच्या विश्वचषकातील दमदार कामगिरीमागचं रहस्य काय?
- Cricket World Cup 2023 : बांग्लादेशचा श्रीलंकेवर ३ गडी राखून विजय, असालंकाची झुंजार खेळी व्यर्थ
- Angelo Mathews : बांगलादेशचा रडीचा डाव, अँजेलो मॅथ्यूजला 'या' नियमाअंतर्गत केलं बाद