लखनऊ : AUS Vs SA Match Highlights :क्रिकेट विश्वचषकाचा १०वा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावून ३११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ ४०.५ षटकांत १७७ धावांत गारद झाला.
ऑस्ट्रेलियाकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. त्यांच्याकडून मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर मिचेल स्टार्कने २७ धावा केल्या. आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने ३, तर केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
कांगारू संघाची सुरुवात खराब : आफ्रिकेच्या ३१२ धावांचा पाठलाग करताना कांगारू संघाची सुरुवात खूपच खराब झाली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्श ७ धावा करून बाद झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नर २७ चेंडूत १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाची येथेच थांबली नाही, यानंतर आलेला विकेटकीपर फलंदाज जोश इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस हेही स्वस्तात बाद झाले.
५ फलंदाज अवघ्या ६५ धावात गारद : ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज अवघ्या ६५ धावात गारद झाले होते. यानंतर मात्र, मार्नस लॅबुशेन आणि मिचेल स्टार्क यांच्यात ६९ धावांची भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी पराभवाचे अंतर कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र मिचेल स्टार्क ५१ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. यानंतर मार्नस लॅबुशेनही केशव महाराजच्या चेंडूवर झेल देऊन बाद झाला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १७७ धावात आटोपला.