कोलकाता Cricket World Cup 2023 AUS vs SA Semifinal : यंदाच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला आपलं नशीब बदलायचं आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया आपली पूर्ण ताकद वापरणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाचा कोणताही अंदाज नाही. मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर कोलकात्याचं तापमान 23 ते 25 डिग्री सेल्सियस इतकं राहू शकते.
दोन्ही संघांचा विश्वचषकातील सामन्यांचा इतिहास काय : ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत सहा वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठलीय. त्यात पाच वेळा विजय मिळवला आहे. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडं 1992 ते 2023 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं पाचव्यांदा अंतिम चारमध्ये प्रवेश केलाय. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. 1999 च्या विश्वचषकात ते पहिल्यांदा एकमेकांसमोर आले होते. तो सामना बरोबरीत सुटला होता, पण सुपर सिक्सच्या टप्प्यातील चांगल्या नेट रनरेटमुळं ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरी गाठली होती.
- हेड टू हेड आकडेवारी : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी तीन विजय नोंदवले आहेत तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये 109 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेनं 55 तर ऑस्ट्रेलियानं 50 सामने जिंकले आहेत. तीन सामने टाय झाले असून एक सामना अनिर्णित राहिलाय.