महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

करोडो भारतीयांचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता; टीम इंडियाचा दारूण पराभव - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव केला. भारतानं दिलेलं २४१ धावांचं लक्ष्य कांगारूंनी ४३ षटकात ४ गडी गमावून सहज गाठलं. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं शानदार फलंदाजी करत १२० चेंडूत १३७ धावा ठोकल्या.

Cricket world cup 2023
Cricket world cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 9:23 PM IST

Updated : Nov 19, 2023, 10:05 PM IST

अहमदाबाद Cricket World Cup 2023 :दोन वेळचा विजेता भारत आणि पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (१९ नोव्हेंबर) विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित ५० षटकात सर्वबाद २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं ४३ षटकात ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.

ऑस्ट्रेलियाची टॉस जिंकून गोलंदाजी : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळत झाली. या मैदानावर चांगला रेकॉर्ड असलेला शुभमन गिल अवघ्या ४ धावा करून परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीचा आलेल्या विराटनं कर्णधार रोहितसोबत मिळून डाव सांभाळला. आक्रमक फलंदाजी करत असलेला रोहित ३१ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्या पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यरही ४ धावा करून तंबूत परतला.

भारताची फलंदाजी ढेपाळली : भारत अडचणीत असताना विराट कोहली आणि केएल राहुलनं थोडीफार चांगली फलंदाजी करत किल्ला लढवून ठेवला. मात्र पॅट कमिन्सच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर विराटनं शरणागती पत्कारली. तो ६३ चेंडूत ५४ धावा करून परतला. यानंतर राहुल वगळता भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. जडेजा ९ तर सूर्यकुमार यादव १८ धावा करून बाद झाले. भारताकडून केएल राहुलनं १०७ चेंडूत सर्वाधिक ६६ धावांचं योगदान दिलं. अशाप्रकारे टीम इंडियानं ५० षटकात २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कनं ३ तर हेडलवूड आणि कमिन्सनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

ट्रॅव्हिस हेडचं शतक : धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा करत कांगारूंना अडचणीत आणलं. डेव्हिड वॉर्नर ७ धावा करून बाद झाला. तर मिशेल मार्श १५ धावांवर तंबूत परतला. स्टीव स्मिथही केवळ ४ धावा करून आऊट झाला. मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेननं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. या दोघांनीही पाचव्या गड्यासाठी १९२ धावांची भागिदारी करत भारतीय गोलंदाजांना सळो की पळो केलं. हेडनं एकदिवसीय क्रिकेटमधलं आपलं चौथं शतक झळकावलं. तो १२० चेंडूत १३७ धावा करून बाद झाला. तर लाबुशेन ११० चेंडूत ५८ धावांचं योगदान देऊन नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहनं ४३ धावा देत २ बळी घेतले.

हेही वाचा :

  1. रोहित 'रेकॉर्डतोड' शर्मा! कर्णधार म्हणून आणखी एक विक्रम केला; जाणून घ्या
  2. निळ्या समुद्रासारखं दिसतंय नरेंद्र मोदी स्टेडियम, पाहा भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची १५ सर्वोत्तम फोटो
  3. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घुसला पॅलेस्टाईन समर्थक, विराटला भेटायला गेला थेट खेळपट्टीवर
Last Updated : Nov 19, 2023, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details