नवी दिल्ली : भारतात क्रिकेट विश्वचषकाला 5 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. तर 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आता या सामन्याच्या तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या गरबा नाईटच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना दुसऱ्या दिवशी आयोजित केला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक ती कारवाईही सुरू केली आहे.
15 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात : 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मात्र त्याच दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी संपूर्ण गुजरातमध्ये गरबा नाइट साजरी केली जाते. त्यामुळे एकाचदिवशी दोन मोठे कार्यक्रम झाल्यास लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आणि सुरक्षेच्या दृष्टीने 15 ऑक्टोबर रोजी गरबा नाईटचे आयोजन करण्यात अडचण येऊ शकते. यासोबतच लॉजिस्टिक लेव्हलच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. हे टाळण्यासाठी बीसीसीआयने हा पुढाकार घेतला आहे. यासाठी बीसीसीआय आयसीसीशी बोलून सामन्याच्या तारखा बदलण्याचा विचार करू शकते.
अहमदाबाद आणि आसपासच्या परिसरात बुकिंग फुल्ल : 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख निश्चित होताच अहमदाबाद आणि आसपासच्या परिसरात हॉटेल रूम, विमानाची तिकिटे, रेल्वे तिकीट यांचे बुकिंग सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, हॉटेलमध्ये रूम उपलब्ध नसल्यामुळे लोकांनी हॉस्पिटलमध्येही बेड बुक करण्यास सुरुवात केली होती.