नवी दिल्ली Gautam Gambhir :क्रिकेटविश्वचषक २०२३ संपल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती पुढील वर्षी होणाऱ्याआयपीएलची. आयपीएल २०२४ साठी दोन वेळच्या चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्समध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आपल्या नेतृत्वाखाली कोलकात्याला दोनदा चॅम्पियन बनवणारा गौतम गंभीर आता संघामध्ये पुन्हा परतणार आहे. मात्र यावेळी तो खेळाडू म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणून टीममध्ये सामील होईल.
काय म्हणाला गौतम गंभीर : गौतम गंभीरनं लखनऊ सुपरजायंट्समधून माघार घेण्याची घोषणा केली. गंभीरनं एका निवेदनात म्हटलं आहे की, "मी भावनिक व्यक्ती नाही. अनेक गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. मात्र हे वेगळं आहे. जिथून हे सर्व सुरू झालं, तेथे मी परतलोय. आज पुन्हा एकदा ती जांभळी आणि सोन्याची जर्सी घालण्याच्या विचारानं माझ्या मनात उत्साह संचारला आहे. मी केवळ केकेआरमध्ये नाही तर आनंदाच्या शहरात परतत आहे", असं गंभीरनं नमूद केलं.
कोलकात्याला २ वेळा चॅम्पियन बनवलं : गंभीर २०११ मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला होता. २०१७ पर्यंत तो संघात राहिला. २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं आयपीएल जिंकलं तेव्हा तो कर्णधार होता. २०२४ च्या आगामी हंगामापासून तो संघाचा मार्गदर्शक म्हणून कोलकाता फ्रँचायझीमध्ये सामील होईल.