जोहान्सबर्ग:बोर्डाच्या सामाजिक न्याय आणि राष्ट्र-निर्माण (SJN) आयोगाच्या अहवालाच्या निकालानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) क्रिकेटचे माजी संचालक आणि कर्णधार ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith) यांना त्यांच्यावरील वर्णद्वेषाच्या आरोपातून मुक्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, SJN आयोगाचे प्रमुख डुमिसा न्त्सेबेझा यांनी सादर केलेल्या 235 पानांच्या अहवालात स्मिथ, विद्यमान मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर आणि माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स यांच्यासह इतरांवर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप केला होता.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड (CSA) च्या निवेदनात म्हटले आहे की स्मिथला 2012 ते 2014 या कालावधीत थामी सोलेकिले विरुद्ध वांशिक भेदभावात सहभागी होण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नव्हते. शिवाय, एनोक नाक्वेऐवजी मार्क बाउचरला दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या स्मिथच्या निर्णयाला वांशिक भेदभावाचे कोणताही स्पष्ट आधार नव्हता. स्मिथचा सीएसएच्या क्रिकेट संचालकपदाचा कार्यकाळ आधीच संपुष्टात आला आहे. त्याचा करार 31 मार्च रोजी संपला आणि त्याने सीएसएकडे या पदासाठी पुन्हा अर्ज न करण्याचा पर्याय निवडला.