नवी दिल्ली Defamation Case Against MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात महेंद्रसिंग धोनीविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली. महेंद्रसिंग धोनी विरोधात त्याचा माजी भागीदार मिहीर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी ही मानहानीची याचिका दाखल केली. न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्या खंडपीठासमोर 18 जानेवारीला या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
व्यावसायिक कराराचं उल्लंघन केल्यानं याचिका :महेंद्रसिंग धोनीनं 6 जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन याचिकाकर्त्यानं आपली 15 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी महेंद्रसिंग धोनीनं मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांच्याविरोधात फौजदारी खटलाही दाखल केला आहे. मात्र रांची न्यायालयानं या प्रकरणी कोणताही आदेश देण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या वतीनं त्याचे वकील दयानंद शर्मा यांनी पत्रकार परिषदेत खोटे आरोप केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. महेंद्रसिंग धोनी 2017 मध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आहे, असंही यावेळी याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.