ब्रिस्टोल - भारतीय महिला क्रिकेटमध्ये शफाली वर्माने आज रविवारी इतिहास रचला. १७ वर्षीय या खेळाडूने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला. यासह ती क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात डेब्यू करणारी सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरली आहे.
१७ वर्ष १५० दिवसांची शफाली वर्मा आज आपला पहिला एकदिवसीय सामना खेळत आहे. त्याआधी तिने १५ वर्ष २३९ दिवसांची असताना पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. तर १७ वर्ष १३९ दिवसांची असताना तिने कसोटीत डेब्यू केला. शफालीने आतापर्यंत २२ टी-२० सामने आणि १ कसोटी सामना खेळला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात पहिला एकदिवसीय सामना ब्रिस्टोल येथे खेळला जात आहे. इंग्लंडची कर्णधार हीथर नाईट हिने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा भारताकडून शफाली वर्माने डेब्यू केला. इंग्लंडकडून सोफिया डंकले ही पदार्पणाचा सामना खेळत आहे. भारताची या सामन्यात सुरूवात खराब झाली. पदार्पणाचा सामना खेळणारी शफाली वर्मा १५ धावा काढून बाद झाली. त्यापाठोपाठ मराठमोळी स्मृती मंधाना (१०) माघारी परतली.