चेन्नई - आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या नाबाद शतक खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर ३ बाद २६३ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे रूटचा हा १००वा कसोटी सामना आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रूट १४ चौकार आणि एका षटकारासह १२८ धावांवर नाबाद होता.
हेही वाचा - पुण्याच्या लिसा स्थळेकरला 'हॉल ऑफ फेम'चा सन्मान
आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रूट हा जगातील नववा तर इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर एक धाव घेत रूटने आपले शतक पूर्ण केले. कॉलिन काउड्रे, जावेद मियांदाद, गॉर्डन ग्रीनिज, एलेक स्टीवर्ट, इंझमाम-उल-हक, रिकी पाँटिंग (दोन्ही डावात शतके), ग्रॅमी स्मिथ आणि हाशिम अमला यांनी रूटच्या आधी आपल्या १००व्या कसोटी सामन्यात शतके ठोकली आहेत. २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही डावात पाँटिंगने शतके ठोकली होती. हा पाँटिंगचा १००वा कसोटी सामना होता.