चेन्नई -चेपॉकवर सुरू असलेली इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी टीम इंडियासाठी अत्यंत निराशाजनक ठरत आहे. पाहुण्या संघाने यजमानांवर वर्चस्व मिळवत तब्बल १९० षटके फलंदाजी केली आणि ५७८ धावांचा डोंगर उभारला. आपल्या तिखट माऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३६ षटके गोलंदाजी केली. यात त्याला ८४ धावांच्या बदल्यात ३ बळी घेता आले. आगामी दुसऱ्या कसोटीत बुमराहला संघात घेऊ नये, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केले आहे.
हेही वाचा - रिषभ पंत : एकीकडे निराशा, दुसरीकडे विक्रम
गंभीरने आपल्या विधानाचे स्पष्टीकरणही दिले आहे. तो म्हणाला,''बुमराहला दुसर्या कसोटीसाठी संघात स्थान देऊ नये. त्याला गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी राखून ठेवावे. या मालिकेसाठी बुमराह महत्त्वाचा आहे. जसप्रीत बुमराह जास्त वेळ गोलंदाजी करू शकत नाही. बुमराहने मोठे स्पेल न टाकता लवकरात लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या मालिकेसाठी तो एक्स-फॅक्टर आहे. त्याला काही झाले तर भारतीय संघ अडचणीत येईल.''