कराची - बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या अनुभवहीन संघाने पाकिस्तान संघाला एकदिवसीय मालिकेत जेरीस आणले आहे. इंग्लंडने तीन सामन्याच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली आहे. तसेच कर्णधार बेन स्टोक्सने अखेरच्या सामना जिंकत पाकिस्तानला व्हाईटवॉश देण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. यादरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने, पाकिस्तान संघासह पीसीबीला धारेवर धरलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यानंतर शोएब भडकला. त्याने यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ज्यापद्धतीने क्रिकेट सिस्टम चालवत आहे, ते पाहता त्यांनी प्लॅनिंग केली आहे की, कोणीही क्रिकेट सामना पाहू नये, तसेच त्यांना फॉलो देखील करू नये.
पाकिस्तान संघाला प्रत्येक चेंडूवर एका धावेची गरज होती. असे असताना देखील इंग्लंडच्या नवख्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी घातली. त्याची कामगिरी निराशजनक राहिली. ते मालिका ३-० ने गमावण्याकडे चालले आहे. पाकिस्तानचा संघ नेहमी सरासरी कामगिरी करण्याकडे लक्ष्य देत आहे. आमचा नेहमी हा इतिहास राहिला आहे की, फलंदाजांनी सामना गमावला आहे. हा ट्रेंड आज देखील कायम आहे, असे देखील शोएब म्हणाला.