ढाका -ऑस्ट्रेलियाने शनिवारी सलग तीन पराभवानंतर बांगलादेशवर अखेर विजय मिळवला. चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला. बांगलादेशच्या शेरे बांगला स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 9 बाद 104 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 19व्या षटकात पूर्ण केले. पण या सामन्यात डॅनियल ख्रिश्चियन याने शाकिब अल हसनच्या एका षटकात 5 षटकार ठोकले.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान चौथ्या षटकात ही घटना घडली. मेहदी हसन याने पहिल्या षटकात मॅथ्य वेडला बाद केलं. त्यानंतर अनुभवी फलंदाज डॅनियल ख्रिश्चियन फलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचत आपले मनसुबे जाहीर केले. चौथ्या षटकात त्याला गोलंदाजी करण्यासाठी शाकिब अल हसन आला. ख्रिश्चियन याने शाकिब अल हसनच्या या षटकात 5 षटकारासह 30 धावा वसूल केल्या.