कोलकाता (पश्चिम बंगाल) Cricket World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक सुरू होण्यासाठी आता फक्त दोन दिवस उरले आहेत. गुरुवारी सलामीच्या सामन्यात गतविजेता इंग्लंड न्यूझीलंडशी भिडेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यानंतर येत्या रविवारी चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात यजमान भारताची लढत बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी आहे.
अक्षर पटेलच्या जागी अश्विनचा समावेश : बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला गंभीर दुखापत झाली आणि तो विश्वचषकातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची संघात निवड करण्यात आली. त्याच्या समावेशामुळे भारतीय संघ अधिक संतुलित झाला आहे. किरण मोरे यांचंही हेच मत आहे. ही भारताची आतापर्यंतची सर्वात संतुलित टीम आहे, असं ते म्हणाले.
टीम इंडियाला फक्त लय सापडण्याची गरज : किरण मोरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी एका खास फोन संभाषणात सांगितलं की, 'आपल्याकडे सर्वोत्तम संघ आहे. आपल्या संघात खूप चांगलं संतुलन आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, आपल्याकडे विकेट्स घेऊ शकणारे गोलंदाज आहेत, जे त्यांच्या दुखापतींना मागे टाकून आपलं सर्वोत्तम देण्यास तयार आहेत. टीम इंडियाला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे 'लय'. सर्व भारतीय खेळाडू विश्वचषक २०२३ साठी सज्ज आहेत', असं ते म्हणाले.