चेन्नई Cricket World Cup २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १९९ धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कांगारूंनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली आणि त्यांचा संपूर्ण संघ ४९.३ षटकात १९९ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि आर अश्विन या भारतीय फिरकी त्रिकुटानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं.
टीम इंडियाची रणनीती यशस्वी ठरली : चेपॉकच्या खेळपट्टीचा अचूक अंदाज घेत टीम इंडियानं ३ फिरकीपटूंसह सामन्यात उतरण्याचा निर्णय घेतला. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय अगदी योग्य ठरला आणि भारतीय फिरकीपटूंनी ६ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजी उद्ध्वस्त केली. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलियाला २०० पेक्षा कमी धावसंख्येवर रोखलं.
जडेजानं कहर केला : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजानं सर्वाधिक कहर केला. जडेजाने अव्वल फलंदाज स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांच्या विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर आणलं. जडेजानं १० षटकात केवळ २८ धावा देत ३ बळी घेतले. या दरम्यान त्यानं २ मेडन ओव्हर टाकले. त्याचा इकॉनॉमी रेट २.८ इतका होता.
कुलदीप-अश्विननं कमाल केली : यंदाच्या विश्वचषकात भारतासाठी ट्रम्प कार्ड समजला जाणारा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं १० षटकात ४२ धावा देत २ बळी घेतले. कुलदीपनं डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन घातक फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचवेळी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननंही ३.४० च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी करत १० षटकांत १ बळी घेतला.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरचा विश्वविक्रम, सचिन, डिव्हिलियर्सला मागं टाकलं
- Cricket World Cup 2023 : भारतात आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव विश्वचषकासाठी उपयुक्त ठरेल - पॅट कमिन्स
- Cricket World Cup 2023 : 'राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत