बर्मिंगहॅम -आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज 'भगवं - निळं' युद्ध रंगणार आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला भारताविरुद्ध झुंजावे लागणार आहे. शिवाय, भारतीय संघ आज पहिल्यांदा भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. त्यामुळे या जर्सीमध्ये भारतीय संघाला प्रत्यक्ष मैदानावर पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. कर्णधार विराटनेही या जर्सीबाबत एक खुलासा केला आहे.
विराटने या जर्सीला १० पैकी ८ गुण दिले आहेत. तो म्हणाला, 'केवळ एका सामन्यापुरता जर्सीमध्ये हा बदल असणार आहे, पण मला डिजाईन खरंच आवडले आहे. भविष्यात जर्सीचा रंग बदलेल असे मला वाटत नाही. कारण निळ्या रंगाची जर्सी घालून खेळणे ही अभिमानाची गोष्ट आहे.'
आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. त्या नियमानुसार भारतीय संघ इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. त्यामुळे ही जर्सी भारताला 'लकी' ठरते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दोन्ही संघ -
- भारत -विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
- इंग्लंड - ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, टॉम करन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.