दुबई -अत्यंत रोमहर्षक सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला हरवत विश्वकरंडक खिशात घातला. या सामन्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत इंग्लंडने भारताला पछाडत पहिल्या स्थानावर झेप घेतली. आयसीसीने आता एकदिवसीय क्रिकेटमधील खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे.
आयसीसीची एकदिवसीय क्रमवारी जाहीर; विराट, बुमराह अव्वल! - jasprit bumrah
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने अव्वल तर गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकावले आहे.
यापैकी, फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीने अव्वल स्थान पटकावले आहे. फलंदाजांच्या या यादीमध्ये कोहलीने 886 गुणांसह पहिले स्थान कायम राखले आहे. तर, याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहितच्या खात्यात 881 गुण जमा आहेत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर सोमवारी आयसीसीने आपला संघ जाहीर केला. या संघात कर्णधार कोहलीला स्थान देण्यात आलेले नव्हते.
आयसीसीने जाहीर केलेल्या गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकावले आहे. बुमराह 809 गुणांसह पहिला तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या सुधारित क्रमवारीत इंग्लंडचा संघ 123 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघ 122 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर न्यूझीलंड, चौथ्या क्रमाकांवर ऑस्ट्रेलिया आणि पाचव्या क्रमाकांवर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. या संघाचे अनुक्रमे 113, 112 आणि 110 असे गुण आहेत.